चंद्रपूर:- राज्यात सध्या दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावरून जाताना अचानक होणारा फटाक्यांसारखा आवाज आणि कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांच्या काळजाचा ठोका चुकतोय. याच बेलगाम तरुणाईला लगाम घालण्यासाठी आता चंद्रपूर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. चंद्रपुरात चक्क जप्त केलेल्या 'मॉडीफाईड' सायलेन्सरवर पोलिसांनी बुलडोझर चालवून एक कडक संदेश दिला आहे.
चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून मॉडीफाईड सायलेन्सर लावून 'धुमस्टाईल' फिरणाऱ्या तरुणांची संख्या वाढली होती. बुलेटमधून फटाक्यांसारखे आवाज काढणे, सायलेन्सरमध्ये बदल करून ध्वनी प्रदूषण करणे अशा तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत चंद्रपूर वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली. शहराच्या विविध चौकांमध्ये नाकाबंदी करून अशा दुचाकीस्वारांना पकडण्यात आले. विशेष म्हणजे, केवळ दंड आकारून पोलीस थांबले नाहीत, तर त्यांनी ते बेकायदेशीर सायलेन्सर काढून घेतले.
जप्त करण्यात आलेले हे सर्व सायलेन्सर चंद्रपूर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते. या सायलेन्सरचा पुन्हा वापर होऊ नये आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी पोलिसांनी या सर्व सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला.
दुचाकीला अशा प्रकारचे बदल करणे बेकायदेशीर असून यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना मनस्ताप होतो. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहील," असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे आता शहरातील शांतता भंग करणाऱ्या 'बुलेट राजां'मध्ये धडकी भरली असून, सामान्य नागरिकांनी मात्र पोलिसांच्या या 'बुलडोझर' अॅक्शनचे स्वागत केले आहे.

