चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून यावेळची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महापालिकेच्या सत्तासमीकरणात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीने निर्णायक एन्ट्री घेतली आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत आपल्या संयुक्त गटाची अधिकृत नोंदणी केली असून, यामुळे महापालिकेतील गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे आणि वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यात आला. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात या संयुक्त गटाची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. या नव्या युतीचा गटनेता म्हणून राहुल विरुटकर यांची एकमताने निवड करण्यात आली असून, महापालिकेत आता हा गट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नोंदणीच्या वेळी नगरसेवक आकाश साखरकर, लहूजी मरस्कोल्हे, मनस्वी गिऱ्हे, श्रुती घटे, स्वेता लाडके, किरण कोतपल्लीवार आणि लता साव यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले की, "शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि निर्णयप्रक्रियेत लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही ही युती केली आहे. आगामी काळात महापालिकेतील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात आमचा गट सक्रिय भूमिका बजावेल.
चंद्रपूर महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने, शिवसेना (उबाठा) आणि वंचितचा हा ८ सदस्यांचा गट आता 'किंगमेकर'च्या भूमिकेत आला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांना सत्तेसाठी या गटाची मदत घ्यावी लागू शकते. त्यामुळे आता चंद्रपूरचा पुढचा महापौर कोण होणार, हे या नव्या गटाच्या भूमिकेवर अवलंबून असेल.


