चंद्रपूर:- भारताने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. मात्र, चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेटवर या आनंदाला वादाचे गालबोट लागले. विजयाचा जल्लोष सुरू असतानाच तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून जुंपली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.
चंद्रपूरचे जटपुरा गेट म्हणजे शहराचे मध्यवर्ती ठिकाण. रविवारी रात्री भारताच्या विजयानंतर हजारो क्रिकेट प्रेमी या ठिकाणी तिरंगा घेऊन जमा झाले होते. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. मात्र, गर्दीत फटाके फोडण्याच्या वादातून धक्काबुक्कीवरून दोन तरुण गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून घटनास्थळी तैनात असलेल्या चंद्रपूर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत संयमाने पण कडक भाषेत दोन्ही गटांना समज दिली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आणि पुन्हा एकदा जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

