चंद्रपूर:- प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर अवघ्या चार वर्षांच्या अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने आपल्या धाडसी आणि देशभक्तीपूर्ण कृतीने चंद्रपूर शहराचे लक्ष वेधून घेतले. गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर हातात तिरंगा घेत इनलाईन स्केटिंग करत अवघ्या 7 मिनिटांत हे अंतर पूर्ण करत अधीरने उपस्थित नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. इतक्या लहान वयात दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी अधीरच्या या अनोख्या देशभक्तीपर पराक्रमाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांमध्ये हा क्षण अविस्मरणीय ठरला.
अधीर जुन्नावार हा चंद्रपूर शहरातील माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूल येथे नर्सरी वर्गात शिक्षण घेत असून, इतक्या लहान वयात त्याने क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘अचिव्हर्स ऑलिम्पियाड’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवणारा तो या वयोगटातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशाबद्दल माउंट कार्मेल कॉन्वेंट शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात थॉमस चर्च तुकूमचे फादर बिपीन यांच्या हस्ते अधीरला पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन, वर्गशिक्षिका मीनाक्षी, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय दैनिक भास्करच्या वतीने नागपूर येथे आयोजित इनलाईन स्केटिंग स्पर्धेत देखील अधीरने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या स्पर्धेतही त्याला पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
अधीरच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण सराव, योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. अधीरच्या या उज्ज्वल यशामुळे जुन्नावार कुटुंबासह संपूर्ण चंद्रपूर शहराचा अभिमान वाढला असून, भविष्यात तो देशपातळीवर आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास पालक, शिक्षक आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.



