Chandrapur News: सूरज गेडामला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Bhairav Diwase
चंद्रपूर:- पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्डच्या बसला नांदेड जिल्ह्यातील माहूर-उनकेश्वर मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका होमगार्डला आपला पाय गमवावा लागला असून काही होमगार्ड जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, होमगार्ड संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून सुमारे २९७ होमगार्ड निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडला गेले होते. १७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता बंदोबस्त संपल्यानंतर, १८ जानेवारीला त्यांना खाजगी बसने परत पाठवण्यात आले. होमगार्डंचा आरोप आहे की, बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता. होमगार्डंनी त्याला गाडी चालवण्यास विरोध केला, मात्र चालकाने त्यांचे ऐकले नाही. परिणामी, चालकाच्या हलगर्जीपणामुळे नांदेड जवळील माहूरगाव येथे बस उलटली.


सूरज गेडामचा पाय निकामी, स्वप्न भंगले

या अपघातात सूरज गेडाम या होमगार्डंचा पाय बसखाली दबल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जखमींपैकी अनेक तरुण हे 'पोलीस भरती'ची तयारी करत होते. या अपघातामुळे त्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न आता धूसर झाले आहे.


प्रशासनाचा निर्दयीपणा?

होमगार्डंनी निवेदनात नमूद केले आहे की, अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिका चालकाने "डिझेल संपले आहे" आणि "हद्द संपली आहे" असे कारण सांगून गंभीर जखमींना नेण्यास नकार दिला. होमगार्डनी सर्वांकडून पैसे काढून विनवणी केली तरी मदत मिळाली नाही. अखेर दुसऱ्या खाजगी बसने जखमींना रुग्णालयात हलवावे लागले.


प्रमुख मागण्या:

होमगार्ड संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे खालील मागण्या केल्या आहेत:
१) सूरज गेडाम याला तातडीची आर्थिक मदत देऊन प्रशासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे.
२) गंभीर जखमी होमगार्डंना योग्य भरपाई मिळावी.
३) ज्या अधिकाऱ्यांनी मद्यधुंद चालक असलेल्या खाजगी बसची व्यवस्था केली, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावे.
४) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जखमी जवानांना वयोमर्यादेत विशेष सवलत द्यावी.
५) ऑगस्ट २०२५ पासून थकीत असलेले मानधन त्वरित मिळावे.


पुढील पाऊल:

जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी सर्व बंदोबस्तांवर बहिष्कार टाकून तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल," असा इशारा होमगार्ड संघटनेने दिला आहे.