Ajit Pawar: 'संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय'; 'अजितदादा' अनंतात विलीन!

Bhairav Diwase
अजित दादा परत या...", "अजित दादा अमर रहे..." अशा गगनभेदी घोषणा, हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि जनसागराच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघा महाराष्ट्र आज सुन्न असून निःशब्द आहे. आज आपल्या 'दादां'ना अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे डबडबले होते.

शासकीय इतमामात निरोप: मानवंदना

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजित पवार यांना पूर्ण शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. पोलिस दलाच्या वतीने हवेत तीन वेळा फायर करुन सलामी देण्यात आली असून मानवंदना देण्यात आली. यावेळी जनसमुदाय निःशब्द झाला, जेव्हा पोलिसांच्या तुकडीने हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिली, तेव्हा उपस्थित जनसागराने 'एकच वादा, अजित दादा', अजित दादा अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पार्थ पवार, जय पवार यांनी मुखाग्नी दिला

आसवांनी भिजली बारामती

अजित पवारांचे पार्थिव जेव्हा अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले, तेव्हा बारामतीतील रस्ते जनसागराने ओसंडून वाहत होते. आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोक घरांच्या छतावर, झाडांवर चढले होते. विशेषतः महिला कार्यकर्त्या आणि तरुण वर्गामध्ये मोठी शोककळा पाहायला मिळाली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे अश्रू अनावर झाले होते, ते पाहून उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला.