MEL मैदानावर अधिवक्त्यांचा क्रिकेट सोहळा.
चंद्रपूर:- अधिवक्त्यांमधील क्रीडाविष्काराला चालना देत परस्पर मित्रता, एकोपा व तंदुरुस्तीचा संदेश देणारी ॲडव्होकेट प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा यावर्षीही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर द्वारा आयोजित ही स्पर्धा दिनांक २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार असून चंद्रपूर शहरातील MEL मैदानावर या रोमांचक क्रिकेट सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
गेल्या सलग 16 वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा 17 वे वर्ष असून प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद व सहभागही या स्पर्धेची ओळख बनली आहे. न्यायालयीन कामकाजातून वेळ काढत अधिवक्ते मैदानावर उतरून आपली क्रीडाप्रतिभा सादर करतात हे या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य आहे.
यंदाच्या हंगामात पुरुषांचे एकूण १७ संघ तसेच महिलांचे ४ संघ सहभागी होणार असून पुरुष व महिला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी संघांकडून सराव सुरू असून खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आणि जिंकण्याची तीव्र इच्छा दिसून येत आहे.
अधिवक्त्यांमध्ये आपुलकीची भावना वृद्धिंगत करणे, तंदुरुस्तीची जाणीव निर्माण करणे तसेच क्रीडाप्रेम जोपासणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. न्यायालयीन ताणतणावातून थोडा आराम मिळावा आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या हेतूने चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर दरवर्षी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत असते.
चार दिवस चालणाऱ्या या क्रिकेट महोत्सवात चुरशीचे सामने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी तसेच संघभावनेचे दर्शन घडणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिवक्ता व क्रीडाप्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. ॲडव्होकेट प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा ही केवळ क्रीडास्पर्धा न राहता अधिवक्त्यांच्या एकोप्याचा आणि उत्साहाचा उत्सव ठरणार आहे.

