चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेचा पेच आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. महापालिकेत कुणाची सत्ता येणार आणि 'किंगमेकर' कोण ठरणार, याचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार आज सकाळी मुंबईला रवाना झाले असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत चंद्रपूरच्या महापौरपदाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
चंद्रपूर मनपाच्या निकालांनंतर सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, चंद्रपूरच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द महत्त्वाचा असून त्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापौरपदाची मागणी केली आहे. मात्र, सुधीर मुनगंटीवार हे उबाठाला महापौरपद देण्याबाबत अनुकूल नाहीत. आजच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. मुनगंटीवारांनी खळबळजनक दावा केला आहे की, काँग्रेसचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात आहे. काही नगरसेवकांनी स्वतःहून संपर्क साधला असून चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. किती नगरसेवक संपर्कात आहेत, हे सांगण्याचे मुनगंटीवारांनी टाळले असून, "सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या तर विरोधक सावध होतील," असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
आज मुख्यमंत्री फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर, मुख्यमंत्री उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे चंद्रपुरात भाजप-उबाठा युती होणार की काँग्रेसमध्ये फूट पडून भाजप सत्ता काबीज करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

