Jorgewar Vs Mungantiwar: चंद्रपुरात वाद पेटला!

Bhairav Diwase
"मंचावर गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, फिल्टर लावणं गरजेचं" आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर:- भाजपमध्ये सुरू असलेल्या 'इनकमिंग'वरून आता अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "पक्षात येणाऱ्यांची नीट तपासणी व्हायला हवी, मंचावर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक दिसत आहेत," असे खळबळजनक विधान जोरगेवार यांनी केले आहे.


चंद्रपूर विधानसभा मतदारसंघावरून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आता 'कोल्ड वॉर' सुरू झाल्याचे चित्र आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच १६०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला, मात्र यावर किशोर जोरगेवार यांनी सडकून टीका केली आहे. जोरगेवार म्हणाले की, केवळ यादी वाचून दाखवणे म्हणजे पक्षप्रवेश नव्हे. पक्षात येणाऱ्यांवर 'फिल्टर' असायला हवा, जेणेकरून असामाजिक तत्त्वे पक्षात शिरणार नाहीत.


आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, १६०० लोक आले म्हणणे चुकीचे आहे, फेसबुक लाईव्ह बघा, मैदानाची क्षमता तपासा. गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि ज्यांना इतर पक्षांनी नाकारले आहे, असे लोक तिथे दिसत होते. पक्ष विस्तारासाठी योग्य लोकांचीच भरती व्हायला हवी.


केवळ पक्षप्रवेशच नाही, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीवरूनही जोरगेवारांनी मुनगंटीवारांना आव्हान दिले आहे. चंद्रपूर मतदारसंघ खुला झाल्यास मुनगंटीवार तिथून लढणार असल्याची चर्चा आहे. यावर जोरगेवार यांनी स्पष्ट केले की, चंद्रपूरच्या जनतेने मला दोनदा आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे २०२९ ला मीच इथून लढणार.


जोरगेवारांचा मुनगंटीवारांवर टोला

मुनगंटीवारांच्या रणनीतीवर टीका करताना जोरगेवार म्हणाले की, साडेतीन वर्षे आधीच जागेची घोषणा करणे हास्यास्पद आहे. लोकसभेच्या वेळी शेवटच्या क्षणी निवडणूक लढवण्यास नकार देऊन मुनगंटीवारांनी पक्षाचे नुकसान केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. "विमान घेऊन कुणाचे तिकीट कापायला मी जाणार नाही," असे म्हणत त्यांनी मुनगंटीवारांच्या कार्यपद्धतीवर उपरोधिक टोला लगावला आहे.