Chandrapur police: दोन मुलांची आई आता बनली 'खाकी' वर्दीची मानकरी!

Bhairav Diwase
साक्षी गेडाम हिची पोलीस भरतीत गगनभरारी!
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवण्यासाठी आता राजुरा तालुक्यातील सोंडो गावची लेक साक्षी गेडाम-उपरे सज्ज झाली आहे. घरची जबाबदारी, दोन लहान मुले आणि पतीचा झालेला अपघात अशा अनेक संकटांच्या चक्रव्यूहात न अडकता, साक्षीने पोलीस भरतीत यश संपादन करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.


कौटुंबिक पार्श्वभूमी आणि संघर्ष:

साक्षी हिचा जन्म १६ जून १९९९ रोजी सोंडो येथे झाला. चौथीत असतानाच आईचे छत्र हरवले, मात्र तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. शिवाजी हायस्कूल आणि शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथून विज्ञान शाखेतून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात असतानाच तिचा विवाह दीपरत्न उपरे यांच्याशी झाला. दोन मुलांच्या जन्मानंतर आणि संसाराच्या व्यापात शिक्षण मागे पडले होते. पतीच्या सांगण्यावरून त्या शिवणकाम करत होत्या, मात्र मनात शिक्षणाची ओढ कायम होती.


प्रेरणा आणि वळण:

साक्षी हिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती मैत्रीण पोलीस रोहिणी रवींद्र दुबे हिच्यामुळे. रोहिणीच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने साक्षी मी पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले. यादरम्यान पतीचा अपघात झाला, घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. तरीही तिने हार मानली नाही. त्यांनी अमोल ठाकरे सरांच्या (MJR Physical Academy) मार्गदर्शनाखाली मैदानी चाचणीचा सराव सुरू केला.

यशाचे गमक:

"सरांचे ६० टक्के मार्गदर्शन आणि माझे ४० टक्के कष्ट या जोरावर मी हे यश मिळवले," अशा शब्दांत साक्षी यांनी आपल्या यशाचे श्रेय पती दीपरत्न उपरे, शिक्षक अमोल ठाकरे, रोहिणी दुबे व परिवारांना दिले. पतीचा पाठिंबा, मैत्रिणीची प्रेरणा आणि सरांचे कठोर परिश्रमामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पोलीस शिपाई पदाला गवसणी घातली आहे.


"संसाराची जबाबदारी सांभाळून पोलीस होणे सोपे नव्हते. पण जिद्द आणि योग्य मार्गदर्शन असेल तर काहीही साध्य करता येते. आज मी त्या कुटुंबाचा हिस्सा होणार आहे, जे समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते, याचा मला सार्थ अभिमान आहे."
साक्षी अशोक गेडाम (नवनियुक्त पोलीस शिपाई)