Police Bharati: बापाने शेळ्या राखल्या, लेकीने खाकी मिळवली; चंद्रपूरच्या दोन लेकींची गगनभरारी!

Bhairav Diwase

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि या निकालाने संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या दोन प्रेरणादायी कथा समोर आणल्या आहेत. 'परिस्थिती आडवी येते, पण ती यशाचा मार्ग रोखू शकत नाही' हे सिद्ध करून दाखवलंय प्रिती सलाम आणि वैष्णवी कारसोरपे या दोन तरुणींनी. ज्यांचे वडील शेळ्या राखतात आणि आई शेतमजुरी करते, त्या घरांत आज आनंदाचा गुलाल उधळला जातोय.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा परिसरातील किरमिरी गावची वैष्णवी देवाजी कारसोरपे वय अवघं २० वर्ष, पण स्वप्न मात्र आभाळाला गवसणी घालण्याचं होतं. वडील देवाजी आणि आई पुष्पा हे दोघेही शेतात राबून संसाराचा गाडा ओढतात. वडील दिवसभर शेळ्या राखायला जातात, तर आई शेतमजुरी करते. पण गरिबीची ही चटके वैष्णवीच्या जिद्दीला कमी करू शकले नाहीत.

'उड्डाण द करिअर अकॅडमी'त शिक्षण मिळाले आणि 'स्टडी पॉईंट' अभ्यासिकेत दिवसरात्र एक करून वैष्णवीने पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. शिक्षक इंजि जितेंद्र पिंपळशेंडे, प्रविण सलाम सर यांच्या मार्गदर्शनाने तिची ही वाट सुकर झाली. आज वैष्णवीची निवड झाली आहे आणि संपूर्ण किरमिरी गावात तिचं कौतुक होत आहे.

वैष्णवीने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, भाऊ, बहिण, भाऊजी आणि मार्गदर्शक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे, प्रविण सलाम सर, सुशांत पेटकुले यांना दिलं आहे.


अशीच दुसरी यशोगाथा आहे चंद्रपूर तालुक्यातील गोंडसावरी येथील प्रिती बंडू सलाम हिची. प्रितीचे वय २२ वर्ष. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा सारखीच. वडील बंडू सलाम शेळ्या चारायला नेतात आणि आई संगिता शेतमजुरी. ऑनलाइन क्लासेस आणि मैदानी सरावासाठी 'उड़ान अकॅडमी'ची साथ घेत प्रितीने खाकी वर्दीचं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. 'स्टडी पॉईंट' अभ्यासिकेत दिवसरात्र एक करून प्रितीने पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.


प्रितीने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, भाऊ आणि मार्गदर्शक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे, मंगेश सर, सुशांत पेटकुले यांना दिलं आहे. ग्रामीण भागातील या दोन लेकींनी पोलीस दलात प्रवेश मिळवून हे सिद्ध केलंय की, कष्ट करण्याची तयारी असेल तर नशिबाच्या रेषाही बदलता येतात.