चंद्रपूर:- भद्रावती येथील बंगाली कॅम्प परिसरात गेल्या चार वर्षांपासून 'अपनापन' वृद्धाश्रम निराधारांची सेवा करत आहे. संचालिका शाहिस्ता खान पठाण यांच्या नेतृत्वात हे कार्य सुरू आहे. मात्र, याच सेवेच्या नावाखाली काही पांढरपेशा गुन्हेगारांनी लुटीचा बाजार मांडल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. त्यांच्या मते, मार्च २०२५ मध्ये चंद्रपूरच्या '३६०° करिअर इन्स्टिट्यूट'चा संचालक नितेश डोईफोडे याने मदतीचे आमिष दाखवून आश्रमाची सर्व माहिती मिळवली.
आरोप आहे की, डोईफोडे याने मदतीऐवजी आश्रमाचा पत्ता आणि फोटोंचा गैरवापर करून जिल्ह्यातून लाखो रुपयांची देणगी स्वतःसाठी गोळा केली. धक्कादायक म्हणजे, याप्रकरणी महिनाभरापासून तक्रार देऊनही पोलीस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप शाहिस्ता खान यांनी केला आहे.
दुसरीकडे, नितेश डोईफोडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'Help Old Age Care Foundation Trust' ही संस्था कायदेशीररित्या नोंदणीकृत असून आमचे सर्व व्यवहार पारदर्शक आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. ८०-जी, १२-ए, एनजीओ दर्पण आणि ई-अनुदान पोर्टलवर नोंदणी असल्याचा पुरावा देत, उलट काही लोकं खोट्या पावत्या बनवून संस्थेची बदनामी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितेश डोईफोडे यांच्याकडून आरोपांचे खंडन केले असून कायदेशीर लढाईचे संकेत दिले आहेत.
आता एका बाजूला मदतीचा गैरवापर झाल्याचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर पारदर्शकतेचा पुरावा. नेमकं सत्य काय, हे आता सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल.


