चंद्रपूर:- इराण, इराक आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचे पडसाद आता थेट सामान्य माणसाच्या किचनपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठा खंडित होईल, या भीतीने चंद्रपूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चक्क बाऊन्सर्सना पाचारण करावे लागले आहे.
चंद्रपूर शहरातील गॅस एजन्सीसमोरची ही दृश्यं पाहा. सकाळच्या कोवळ्या उन्हातच नागरिकांनी सिलिंडरसाठी लांबलचक रांगा लावल्या आहेत. जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने गॅसचा तुटवडा भासेल, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. घरपोच डिलिव्हरी सुरू असूनही, आपला नंबर लागेल की नाही, या शंकेने नागरिक थेट एजन्सीवर धाव घेत आहेत.
गर्दी इतकी वाढली की एजन्सी मालक आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमकी उडू लागल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून काही एजन्सी मालकांनी चक्क खासगी बाऊन्सर्स तैनात केले आहेत. गॅस एजन्सीच्या दारात बाऊन्सर उभे राहण्याची चंद्रपूरमधील ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
एकिकडे प्रशासन सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे नागरिकांमधील घबराट कमी व्हायचे नाव घेत नाहीये. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे .


