चंद्रपूर:- चंद्रपूर शहराची ओळख आणि शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक 'रामाळा तलाव' सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून या तलावात मोठ्या प्रमाणात मासोळ्या मृत अवस्थेत आढळून येत आहेत. पाण्यावर तरंगणाऱ्या या शेकडो मृत माशांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे तलावात मिसळणारे शहरातील सांडपाणी! तुकूम, बंगाली कॅम्प आणि शास्त्रीनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांतील सांडपाणी मोठ्या नाल्यांद्वारे थेट या तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी खालावली असून पाणी अत्यंत विषारी झाले आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर या तलावातील जैवविविधता पूर्णपणे नष्ट होईल. तलावाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा म्हणजेच STP प्लांट त्वरित उभारावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


