Chandrapur Police: 'शेट्टी गँग'च्या अट्टल गुन्हेगार गजाआड; चंद्रपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- 'शेट्टी गँग'च्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी नागपुरातून बेड्या ठोकल्या आहेत. सावली आणि मूल परिसरातील दोन मोठ्या घरफोड्यांचा छडा लागला असून, तब्बल ११२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.


चंद्रपूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमधील मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी, जो सध्या नागपूरच्या दिघोरी परिसरात राहत होता, त्याला स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले.


तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने सावली आणि मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचे सोने त्याने नागपूरमधील तीन वेगवेगळ्या सोनारांना विकले होते. पोलिसांनी तत्परता दाखवत या सोनारांकडून ११२ ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली आहे, ज्याची बाजारपेठ किंमत १६ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय. अमोल काचोरे आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.