चंद्रपूर:- चालत्या ट्रेनमध्ये चढणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आला आहे. नवी दिल्लीवरून चेन्नईकडे जाणाऱ्या तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये चढताना एका युवकाचा पाय अचानक घसरला आणि तो थेट मृत्यूच्या दारात पोहोचला होता. पण... म्हणतात ना, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती!' रेल्वे पोलीस आणि काही प्रवाशांच्या अचाट धाडसामुळे या युवकाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. हा संपूर्ण थरार रेल्वे स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून तामिळनाडू एक्स्प्रेस हळूहळू पुढे सरकत आहे. इतक्यात एक युवक धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळी त्याचा ताबा सुटतो आणि पाय घसरल्याने तो थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या धोकादायक पोकळीत खेचला जातो. काही सेकंदांचा जरी उशीर झाला असता, तर या युवकाचा चक्काचूर झाला असता. पण तिथेच कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस जवानाची आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची नजर या युवकावर पडते. क्षणाचाही विलंब न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे देवदूत धावत सुटतात. ट्रेन गती पकडत असतानाच, या युवकाला रेल्वे खालून अत्यंत वेगाने बाहेर ओढले जाते.
हा संपूर्ण थरार पाहून स्टेशनवरील इतर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, युवकाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वे पोलीस आणि त्या धाडसी प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे एका कुटुंबाचा दिवा विझण्यापासून वाचला आहे. सध्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण रेल्वे विभागात आणि चंद्रपूर जिल्ह्यात कौतुक होत आहे.


