NEET पेपरफुटी प्रकरण : सीबीआयच्या पथकांनी गोपनीयता पाळत ब्रह्मपुरीतील विद्यार्थ्याच्या घरावर छापा

Bhairav Diwase
चंद्रपूर:- देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. लातूरमधील नामांकित कोचिंग क्लास संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच CBI ने तपासाची चक्रं वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात CBI ने अत्यंत गोपनीय पद्धतीने मोठी धडक कारवाई केली आहे.


CBI च्या दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात एका संशयित विद्यार्थ्याच्या घरावर थेट छापा टाकला. विशेष म्हणजे या कारवाईची स्थानिक पोलिसांना पुसटशी कल्पनाही देण्यात आली नव्हती. अत्यंत गुप्तपणे हे पथक ब्रह्मपुरीत दाखल झाले आणि संशयित विद्यार्थ्याच्या घराची झाडाझडती सुरू केली.


मिळालेल्या माहितीनुसार, हा संशयित विद्यार्थी नांदेड येथील मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लासचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. मोटेगावकरांच्या चौकशीतून मिळालेल्या महत्त्वाच्या सुगाव्यावरूनच CBI थेट या विद्यार्थ्याच्या दारापर्यंत पोहोचली. या छाप्यात CBI अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, इतर डिजिटल उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका किंवा त्याची उत्तरे पुरवण्यात आली होती का? तसेच यामागे कोणते मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? याचा शोध आता CBI घेत आहे.


लातूर, नांदेड आणि आता थेट चंद्रपूर... या कारवाईमुळे संपूर्ण विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळात विदर्भातील आणखी काही विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.