Chandrapur News: चंद्रपूर हादरले! आश्रमशाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलांनी घरी माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणात आश्रमशाळेतीलच दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा समोर आला आहे. ही बाब आधीच शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, पण प्रशासनाने या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप पीडित मुलांच्या पालकांनी केला आहे.



घटना उघडकीस आल्यानंतर पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय व सामाजिक वर्तुळात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन शाळा प्रशासन आणि आरोपींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.