Bramhapuri Police: ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; बार फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- शहरातील व ग्रामीण भागातील बारचे शटर वाकवून विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीच्या ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी नागभीड तालुक्यातील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची दारू व गुन्ह्यात वापरलेल्या तीन वाहनांसह एकूण ११ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सीसीटीव्ही बंद करून केली होती चोरी
दि. १७ जुलै २०२६ रोजी अड्याळ येथील बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करत १,६६,८०५ रुपयांचा माल लांबवला होता. शंतनु प्रकाशराव बगमारे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्यांनी आधी कॅमेरे बंद करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले.


पोलीस तपासादरम्यान दुसरे आव्हान:

पहिल्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी अवघ्या आठ दिवसांत खरकाडा (ता. ब्रम्हपुरी) येथील अमीत दादाजी बनकर यांच्या बारचे मागील शटर वाकवून २,१३,२२७ रुपयांचा ऐवज लांबवला. लागोपाठ घडलेल्या दोन चोऱ्यांमुळे ब्रम्हपुरी पोलिसांनी हे आव्हान गांभीर्याने घेतले.


तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई:

ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. दोन्ही बारमधील चोरी एकाच टोळीने केल्याचा संशय आल्याने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासाअंती सौरभ अनिल वाघाडे (२६, रा. बामणी), जगदिश दिपक शेंन्द्रे (२५, रा. राममंदिर चौक, नागभीड), अभिषेक अशोक अलोने (२६, रा. कुनघाडाचक) आणि विशाल दिवाकर ठाकरे (२३, रा. मांगली अरब) या चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


तीन वाहनांसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त:

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेली विदेशी दारू आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी (MH 29 AR 5844 - कि. ५ लाख), मारुती बलेनो कार (MH 33 AD 1114 - कि. ७ लाख) आणि मारुती एस-प्रेसो कार (MH 34 VY 7487 - कि. ४ लाख) असा एकूण ११,०४,००० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील दोन्ही बारफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.


कारवाई करणारे पथक:

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) श्री. साहिल झरकर, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पो.ह. मुकेश गजबे, मिलिंद नैताम, पो.अं. प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार, वशिष्ट रंगारी यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. मनोज खडसे करत आहेत.