चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या अमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी एक विशेष टिपलाईन मोबाईल क्रमांक 7887890100 सुरू केला आहे.
युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी ही नवी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक, विद्यार्थी किंवा पालक अमली पदार्थांची खरेदी-विक्री, साठा किंवा सेवनाबाबतची कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास थेट 7887890100 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे, नागरिक या क्रमांकावर थेट कॉल करून किंवा व्हॉट्सॲपद्वारे मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे नाव, पत्ता आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आपल्या परिसरात कुठेही असा गैरप्रकार आढळल्यास भीती न बाळगता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

