चंद्रपूर:- शासनाची बंदी कागदावरच राहिली असून चंद्रपुरात सुगंधित तंबाखू आणि खऱ्याचा काळाबाजार आता खुलेआम सुरू झाला आहे. शहरात अगदी जागच्या जागी खर्रा उपलब्ध होत असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्रीवर कायदेशीर बंदी आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच पाहायला मिळत आहे.
शहराच्या मुख्य चौकापासून ते अगदी गल्लीबोळांतील पानठेल्यांपर्यंत सुगंधी तंबाखू आणि खर्रा सर्रास विकला जात आहे. या बेकायदेशीर व्यवसायावर वेळेवर कारवाया करणे ही अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे. परंतु, पोलिसांचा खाकीचा धाक संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अधूनमधून नाममात्र कारवायांचा फारस दाखवला जातो.
चंद्रपूर शहरात कुठेही जा, सहज खर्रा मिळतो. शाळा-कॉलेजच्या आसपासच्या दुकानांवरही हेच सुरू आहे. सुगंधित तंबाखूच्या या उघड्या नागड्या विक्रीमुळे कर्करोगासारख्या भयंकर आजारांचा विळखा वाढतो आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, अन्न व औषध प्रशासन या तंबाखू माफियांवर कडक कारवाई करणार की, सर्वसामान्यांच्या आरोग्याची अशीच हेळसांड सुरू राहणार?

