चिमूर:- मैत्री दिन साजरा करण्यासाठी शंकरपूरजवळील मुक्ताई धबधब्याकडे निघालेल्या तीन तरुणींना रविवारी भिसीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यातील एका तरुणीचा नागपूर येथे उपचाराच्या दरम्यान सोमवारी मृत्यू झाला. रिया देवगिरीकर (वय २०, रा. हिंगणघाट) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मुक्ताई धबधबा पाहण्यासाठी काही मित्र मैत्रिनी निघाल्या होत्या. रविवारी दुपारी २:३० वाजता भिसीजवळ नाश्त्यासाठी थांबल्या असताना भरधाव कारने तीन तरुणींना धडक दिली. या अपघातात रिया देवगिरीकर (वय २०, रा. हिंगणघाट) हिला गंभीर दुखापत झाली होती. तिला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.
मैथिली सामंत (वय १९, रा. नागपूर), द्विंकल चिकटे (वय २०, रा.चंद्रपूर) यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व तरुणी नागपूर येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. मैत्री दिनाच्या दिवशीच एका मैत्रिणीला कायमचे गमवावे लागल्याने त्यांच्या मित्र-मैत्रिणींवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

