ब्रम्हपुरी:- मासेमारीसाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे. या घटनेमुळे उदापूर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. बेपत्ता मित्राचा शोध सुरू आहे. अरुण श्रावण डोंगरवार (वय ३९, रा. उदापूर) असे मृतकाचे नाव आहे. तर जयपाल प्रल्हाद नाकतोडे (वय ३५, रा. उदापूर) यांचा शोध घेण्यात येत आहे.
अरुण डोंगरवार आणि जयपाल नाकतोडे हे दोघेही ३० जुलै रोजी गराडी नाल्यावर मासेमारीसाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. १ ऑगस्ट रोजी सकाळी पारडगाव शिवारातील नाल्यात अरुण डोंगरवार यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मासेमारी करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात वाहून गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बेपत्ता जयपाल नाकतोडे यांचा शोध घेण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
बेपत्ता जयपाल नाकतोडे यांचा तातडीने शोध घेण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन दिवसानंतरही त्याचा शोध लागला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

