Death News: तलावात बुडालेल्या युवकाचा २४ तासांनंतर मृतदेहच हाती

Bhairav Diwase

कुरखेडा:- तालुक्यातील धानोरी येथील तलावात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुमारे २४ तासांच्या शोधमोहिमेनंतर ३ रोजी दुपारी एनडीआरएफचे पथक व स्थानिक मच्छीमारांना अखेर या युवकाचा मृतदेह आढळला.


पंकज दिलीप वाटगुरे (२२) हा रविवारी धान रोवणीचे काम आटोपल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेला होता. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच, ग्रामस्थांनी धाव घेत तत्काळ शोधकार्य सुरू केले, परंतु अंधार आणि पाण्याची अधिक खोली यामुळे रात्रीपर्यंत यश आले नाही.


सोमवारी सकाळी पुन्हा एकदा मोटारबोट आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य तीव्र करण्यात आले. आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तलावातील चिखलात रुतलेला मृतदेह मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाली.