चंद्रपूर:- चंद्रपूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नागपूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना महिला प्रवाशाच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या नागपूर येथील चार महिला आरोपींना रामनगर गुन्हे अन्वेषण पथकाने अत्यंत तत्परतेने अटक केली आहे. आरोपींकडून एकूण २ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीमती सुधा नारायण तुरकेले (वय ५३ वर्षे, रा. नगीनाबाग, चंद्रपूर) या दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर बसस्थानकावरून नागपूरला जाण्याकरिता बसची वाट पाहत उभ्या होत्या. नागपूर प्लॅटफॉर्मवर बस आल्यानंतर त्यात चढत असताना अज्ञात चोराने त्यांच्या पर्समधून ७२,००० रुपये किमतीचे सोन्याचे कानातील झुमके आणि १,४५,००० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांचे जाळे आणि थरारक पाठलाग:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख सपोनि शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वात विशेष पथके तयार करण्यात आली.
पडोली चौकात शोध: पोलिसांच्या एका पथकाने बसस्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान पडोली चौकात दोन महिला संशयितरीत्या वावरताना आढळल्या. रूपा विशाल नाडे (वय २५) व मैना महेंद्र मानकर (वय ३५, दोघे रा. रामेश्वरी टोली, नागपूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरी केलेला ऐवज त्यांच्या इतर साथीदारांकडे देऊन त्या ट्रॅव्हल्सने नागपूरला निघून गेल्याची माहिती दिली.
वरोऱ्यात ट्रॅव्हल्स थांबवून कारवाई: माहिती मिळताच पोउपनि. दराडे व त्यांच्या पथकाने तात्काळ नागपूर मार्गावर पाठलाग करून वरोरा येथील आनंदवन चौकात संबंधित ट्रॅव्हल्स थांबवली. गाडीची झडती घेतली असता अनिता पिंटू हातागडे (वय ३५) व ज्योती विजय हातागडे (वय ३२, दोघे रा. रामेश्वरी टोली, नागपूर) या दोन महिला मिळून आल्या. ज्योती हातागडे हिच्याकडून तक्रारीत नमूद केलेला संपुर्ण सोन्याचा ऐवज (झुमके व मंगळसूत्र) जप्त करण्यात आला.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके तसेच रामनगर पोलीस स्टेशन ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. सर्व महिला आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

