पोंभुर्णा:- पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचे रक्षण ही काळाची गरज बनली आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चेक आष्टा येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळा परिसर हिरवागार करण्यासोबतच विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली.
१ ऑगस्ट रोजी चेक आष्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी श्री. जगनभाऊ येलके, श्री. हरिशभाऊ ढवस, श्री. जयंतभाऊ पिंपळशेंडे, श्री. अमितभाऊ वाढई, श्री. सत्यपाल येरमे यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व समजावून सांगत 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमास प्रतिसाद देत विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली आणि निसर्ग संरक्षणाची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री. रवींद्र कोठारे सर, विषय शिक्षक सतिश शिंगाडे सर, मंगेश मोरे सर, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश संपूर्ण गावात प्रभावीपणे पोहोचला आहे.

