पायऱ्यांवर काँग्रेसचे आंदोलन, तर सभागृहात कोरमावरून वाद
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आज राजकीय संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळाला. महापौर संगीता खांडेकर यांच्या मनमानी कारभाराचा आरोप करत काँग्रेसच्या धानोरकर गटाने महापालिकेच्या पायऱ्यांवर उतरून जोरदार निदर्शने केली आणि आमसभेवर बहिष्कार टाकला. मात्र, दुसरीकडे सभागृहात कोरम पूर्ण करण्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्येच नव्हे, तर त्यांच्या अंतर्गत गटांमध्येही मोठा हायव्होल्टेज ड्रामा रंगला.
काँग्रेसच्या वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात हजेरी लावत महापौरांना कोरम पूर्ण करण्यासाठी मदत केली. मात्र, याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार समर्थक भाजप नगरसेवक आणि खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक काँग्रेस नगरसेवक सभागृहात धडकले आणि गोंधळ उडाला. नेमका कोरम पूर्ण झाला की सभा बेकायदेशीर ठरली, यावर आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन होऊन सहा-सात महिन्यांचा काळ लोटला तरी महापौरांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेवकांनी मनपाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. फलक झळकावत महापौरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सभेची नोटीस वेळेवर न देणे, वारंवार नियम मोडून आमसभा बोलावणे आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडवून ठेवणे, असे गंभीर आक्षेप विरोधकांनी घेतले. शहराच्या विकासाला खिळ बसवणाऱ्या या कारभाराचा निषेध करत काँग्रेसच्या धानोरकर गटाने आजच्या सभेवर पूर्णतः बहिष्कार टाकला.
पायऱ्यांवर आंदोलन सुरू असतानाच सभागृहाच्या आत भलताच राजकीय खेळ सुरू होता. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा पटलावर आल्याने वातावरण तापले होते. सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकत कोरम अपुरा ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नाट्यमय घडामोडीत काँग्रेसमधील वडेट्टीवार गटाचे नगरसेवक अचानक सभागृहात उपस्थित झाले. त्यांनी आमदार मुनगंटीवार गटाच्या महापौरांना साथ देत आवश्यक २२ सदस्यांचा कोरम पूर्ण करण्यासाठी मदत केली.
वडेट्टीवार गटाच्या या पवित्र्याची माहिती मिळताच भाजपचे आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक आणि काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक तातडीने सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सभागृहात जोरदार घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला. प्रत्यक्ष सभा सुरू असताना कोरम पूर्ण झाला होता की नाही, यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
या सर्व गोंधळामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. सभा अधिकृत आणि वैधरीत्या पार पडली की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला असून, आता याप्रकरणी महापालिका प्रशासन आणि आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
