चंद्रपूरच्या महाकाली मंदिरासमोरील दुकानदारांचे आता देवीलाच साकडे.

Bhairav Diwase
उघड दार देवा आता उघड दार देवा, असे म्हणण्याची वेळ या दुकानदारांवर आली.
Bhairav Diwase.   June 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माणसांसह देवही टाळेबंद झाले. मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आले आणि मंदिर व्यवस्थापनाने ताबडतोब प्रतिसाद देत दर्शनासाठी मंदिरे बंद केली.
जिल्ह्याचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिराचाही त्यात समावेश आहे. मंदिरासमोर प्रसाद, हार-फुले विक्रीची दुकाने असतात. दिवसभरात होणाऱ्या विक्रीवरच त्यांच्या घरची चूल पेटत असते. यात्रा, किंवा काही विशेष दिवशी भाविक अधिक प्रमाणात येते, तिच या दुकानदारांसाठी दिवाळी. एरवी तुटपुंज्या विक्रीवर आणि त्यातून मिळणाऱ्या रोजीवरच त्यांची गुजराण सुरू असते.

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून मंदीर बंद असल्याने अनेक दुकानदार आर्थिक अडचणीत आहेत. लॉकडाउन शिथिल करण्यात आले. हळूहळू सर्व क्षेत्रे पूर्वपदावर येत आहेत. मात्र, मंदिरे अजूनही बंदच आहेत. त्यामुळे उघड दार देवा आता उघड दार देवा, असे म्हणण्याची वेळ या दुकानदारांवर आली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले माता महाकालीचे मंदिर चंद्रपुरात आहे. या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळेच दरवर्षी लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. चैत्र महिन्यात माता महाकालीची मुख्य यात्रा भरते. या यात्रेत तेलंगणा, आंध्र प्रदेश, नांदेड, परभणी, लातूर व अन्य जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मागील अनेक वर्षांपासून हजारो भक्त नियमितपणे दर्शनाला येण्याची परंपरा मोठ्या श्रद्धेने पार पाडत आहे.
या मंदिरासमोर पूजेचे साहित्य विक्रीची शंभराहून अधिक दुकाने आहेत. दर्शनासाठी येणारे भाविक या दुकानांतून पूजेचे साहित्य खरेदी करतात. दिवसभराच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या दुकानदारांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मार्च महिन्यांत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील मंदिरे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महाकालीच्या मंदिराला टाळे लागले. घराबाहेर निघण्यावर बंदी असल्याने मंदिराकडे भक्तांचे येणे थांबले. दुकानदारांना नाइलाजास्तव आपली दुकाने बंद करावी लागली.

चैत्र महिन्यात माता महाकालीची मुख्य यात्रा भरते. या यात्रेला लाखो भाविक येत असतात. त्यामुळे अनेक दुकानदार हजारो, लाखो रुपयांचे पूजेचे साहित्य आधीच खरेदी करून ठेवत असतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा यावर्षी भरलीच नाही. मंदिराच्या इतिहासात यात्रा न भरण्याची ही पहिलीच वेळ होती.
यात्राच न झाल्याने या दुकानदारांचे वर्षभराचे बजेट कोलमडले आहे. आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे अनेक क्षेत्रे पूर्वपदावर येऊ लागली आहेत. मात्र, मंदिरांचे टाळे अजूनही कायम आहेत. भक्ताला देवीकडे साकडे घालण्यासाठी पूजेचे साहित्य विक्रीतून हात देणाऱ्या या दुकानदारांवर आता मंदिर सुरू करण्यासाठी माता महाकालीकडे साकडे घालण्याची वेळ आली आहे. यातूनच ते बया दार उघड असे म्हणू लागले आहेत.