Click Here...👇👇👇

दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पूलाच्या कामात शासन नियमांना तिलांजली.

Bhairav Diwase
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा शुन्य, नागरिकात चर्चेला उधाण.

संबंधीत विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज.
Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पारडी-खातेरा पूलाचे काम वैनगंगा नदीवर युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र याठिकाणी शासनाच्या नियमांची अक्षरशः ऐशीतैशी होताना दिसत आहे. सदर पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप होत असून महाराष्ट्रात सध्या कुठेही रेती घाटाचे लिलाव झालेले नसताना एवढ्या मोठ्या पूलाचे काम कसे होत असावे,याविषयी माहिती घेतली असता त्याच ठिकाणची माती मिश्रित रेती उपसा करून पूलाचे बांधकाम सुरू असल्याचे बोलले जात आहे.जर ही बाब खरी असेल तर सदर पूल बांधकामाच्या दर्जाबद्दल न बोललेलेच बरे.तसेच इस्टीमेट नुसार ही सदर काम होत नसल्याची चर्चा आहे.
याच बरोबर संबंधित ठेकेदारांनी कामगारांना कोणत्याच प्रकारची सुरक्षा प्रदान केलेली दिसत नाही.पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची पर्वा न करता याठिकाणी कामगारांना काम करावे लागत असल्याचे चित्र असून उदाहरणार्थ जोडे,हेल्मेट सारख्या इतर वस्तूंची सुरक्षा किट नसल्याचे चित्र आहे.कामगारांना जीवन सुरक्षा कवच ही नसल्याची माहिती असून भविष्यात काही अनुचित प्रकार घडलाच तर ठेकेदार जबाबदारी स्वीकाणार का ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.कृषक जमीनीवर अशाप्रकारे जर काम करायचे असल्यास नियमाप्रमाणे शेती अकृषक असणे बंधनकारक असते मात्र सदर कंत्राटदाराने येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मशीन बसवुन काम सुरू केल्याचे दिसत आहे.मशीन अॉपरेटरला ही कोणतीही सुरक्षा दिसत नाही.असे असताना सदर कंपनी मॅनेजर स्वत: नेहमी नागपूर,गडचिरोली याठिकाणावरून ये-जा करीत असल्याची माहिती असून जर असे घडत असल्यास नियमाप्रमाणे 14 दिवस कॉरंटाईन व इतर शासनाने लागु केलेले नियम यांना लागू होते मात्र असे काहीच घडत नसल्याचे बोलले जात आहे.यामुळे कोरोना संबंधी धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिक सांगतात.असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत असल्याने याविषयी वारंवार तक्रार करूनही काहीच परिणाम होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.ऐन वर्दळीच्या ठिकाणी मिक्सर मशीन बसवल्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण होत असल्याची बोंब सुरू असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे.एकुणच याठिकाणी मोठ्याप्रमाणात शासन नियमांची पायमल्ली करत पूलाचे बांधकाम होत असल्याचे दिसून येत असून शासनाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी सदर ठिकाण स्वत: भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सखोल चौकशी करावी,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी मॅनेजर व कामगारांची योग्य ती तपासणी करावी.नियमाविरूद्ध काही आढळल्यास संबंधीत जबाबदार व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सुरू असलेले सदर काम व इतर बाबींसंदर्भात माहिती घेण्यासाठी मॅनेजर सोबत आमचे आधार न्यूज पोर्टल चे प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क झाला नाही.आता संबंधीत अधिकार्‍यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.