Top News

जादुटोण्याचे संशयावरून भर चौकात बांधून मारहाण करणारे वणी खुर्द येथे आठ दिवसांनंतरही भयाण शांतता! प्रबोधनाची गरज. #Jiwati



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडावरचा तालुका जिवती या तालुक्यातील पाचशे सहाशे लोकसंख्या असलेलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं नयनरम्य वणी खुर्द गाव.गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे प्रचारक तसेच अठरा पगड जातीतिल काही लोक गुण्यागोविंदाने राहतात. बौद्ध विहार, समाजमंदिर, हनुमान मंदिर, चर्च अशी प्रार्थना स्थळे ही आहेत.गावातील सर्व लोक सर्व जातीधर्माच्या उत्सवात सहभागी होतात, पट्टा (वर्गणी) ही देतात. अशाच प्रकारे मोहरमच्या सवारी साठी वर्गणी गोळा झाली. शेजारच्या तेलंगणा राज्यातून सवारी आली. सवारीच्या पारंपरिक वातावरणामुळे प्रेरीत होऊन एका महिलांचे अंगात आलं आणि अंगात आल्यावर तिने सांगितलं,"इस गाव में भानामती हो रही हैं". गावातील लोकांचे कान टवकारले!
गाव तिथे भानगडी, आणि माणूस तिथं समस्या आल्याच. पण याची जड भानामती, करणी व जादुटोणा आहे.अशी कुजबूज सुरू झाली.दुसरा दिवस उजाडला, आता तिन महिलांच्या अंगात आलं त्यांनीभानामती करणा-या कुटूंबाचाही उल्लेख केला.गावात जादुटोणा भानामती च्या गप्पांचे फड रंगले. भानामती करणा-यांना जाब विचारला पाहिजे असं ठरलं त्यासाठी दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चौकातील मांडवात सभा घ्यायची ठरलं.संपुर्ण गावाला निमंत्रण गेलं.त्यात अंगात आणणा-या महिला आणि भानामती चार संशय असणारं कुटुंब ही होते.गावातिल लोकं एकत्र झाली.तिनही महिलांचे अंगात आलं, घुमायला लागल्या,लोळायला लागल्या.एकच आरडाओरड,"सांग, भानामती कोणी केली". अंगात आणणा-या महिला लोळतालोळता माती फेकायला लागल्या.'इकडे फेक'.असेही गावाच्या झुंडीतील आवाज आणि माती शांताबाई कांबळे,शिवराज कांबळे, एकनाथ सुके,प्रयागबाई सुके, पंचफुला हुके यांचेकडे फेकल्या गेली.त्यामुळे हे सर्व भानामती, जादुटोणा-याचे संशयीत ठरले.
लगेच त्यांची विद्या बाटविण्याचा खेळ सुरू झाला.भानामती किंवा अघोरी विद्या करण्यासाठी काही लपवून ठेवलं का?याचा शोध गावातील मंडळी घ्यायला लागले, दरम्यानच्या काळात त्यांना मांडवाच्या लाकडी खांबाला बांधले.अघोरी विद्या बाटविण्याचा साठी मारहाण सुरू यात गावकऱ्यांसोबत त्यांचे नातेवाईकांचा ही समावेश होता.झुंडीचा लाभ उठवत अनेकांनी वैयक्तिक हिशोब ही चुकतं केलं.बाकी अख्खं गाव मुकदर्शक होतं.#Adharnewsnetwork


गावातील कोणीतरी बाहेरगावी गेलेल्या अनिल सोनकांबळे या युवकाला सांगितले.अनिल नी घटनेचे गांभीर्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचारांचा सामाजिक कार्यकर्ता सुग्रीव गोतावळे यांना सांगितले.सुग्रीव पोलीसांना घेऊन वणी खुर्द ला गेला.बांधून ठेवलेल्या लोकांची सुटका झाली.भानामतीचे बळी वाचले पण त्यातील काही गंभीर जखमी झाले.
घटना माहीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चमु चंद्रपूर जिल्हा संघटक अनिल दहागावकर जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांचे नेतृत्वाखाली गावात गेली. पोलीसांचे सहकार्याने चमत्कार प्रात्यक्षिकांसह प्रबोधन सभा घेतली.जादुटोणा विरोधी कायद्याच्या प्रचाराची चित्रमय प्रदर्शन गावात लावली.सभा शांततेत झाली, लोकांना घडलेल्या घटनांचा पश्चात्ताप व्हायला लागला.अंगात येणाऱ्या महिलांना चंद्रपूर ला जिल्हा रुग्णालयात मनोविकार विभागात भरती केलं.उपचार सुरू झाले.आठ दिवसांनंतर पुन्हा आम्ही अभाअंनिसचे कार्यकर्ते ( हरिभाऊ पाथोडे, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, यशवंत कायरकर) वणी खुर्द गावी गेलो. चित्रप्रदर्शन लावलेलं होतेच.पिडीतांची भेट घेतली.धीर दिला, जादुटोणा भानामती चे संशयावरून कोणीही वाकडी नजर करणार नाही, याचा विश्वास दिला आणि गावं सोडलं.अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन शिबिराची गरज आहे अशी ही मागणी काही युवकांनी केली.त्यादृष्टिने काम सुरू आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना निवेदन दिले.पोलीस पाटलांना 'जादुटोणा कायद्याच्या'प्रशिक्षाची गरज आहे.यावर चर्चा केली.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहकार्य राहील याची ग्वाही दिली.आजही अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची खूप गरज आहे.तळमळीच्या कार्यकर्त्यांनी सामील व्हावे.खारीचा वाटा द्यावा.तनमनधनाने मदत करावी.#Jiwati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने