मनपासाठी काँग्रेसकडून इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली असून, राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेस (काँग्रेस) पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे.
चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले अर्ज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ पासून ते २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत भरून द्यायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मिळवण्याचे व ते भरून स्वीकारण्याचे ठिकाण युनिक फर्निचर, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, गांधी चौक, चंद्रपूर हे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज सादर करताना उमेदवारांनी निश्चित केलेले शुल्क जमा करणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी हे शुल्क ₹ २,५००/- (अडीच हजार रुपये) असून, इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ ५,०००/- (पाच हजार रुपये) निश्चित करण्यात आले आहे.
इच्छुक आणि पात्र असलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नियमांनुसार वेळेत अर्ज सादर करून पक्षश्रेष्ठींना सहकार्य करावे आणि पक्षाला बळ द्यावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे.


