Fire News: शेतकऱ्याच्या कष्टावर फिरवलं पाणी; घरात साठवलेला १६ क्विंटल कापूस अज्ञाताने जाळला!

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी परिसरातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. जुन्या वादातून किंवा वैमनस्यातून एका शेतकऱ्याचा कष्टाचा कापूस जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना लालहेटी येथे घडली आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेंबाळ पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या लालहेटी येथील शेतकरी विकास ऊर्फ नोमाजी चुदरी यांनी आपल्या शेतातील १६ क्विंटल कापूस काढून एका नवीन घरात साठवून ठेवला होता. या घराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अजून दारे आणि खिडक्या बसवणे बाकी होते. हीच संधी साधून मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी घराच्या मागील खिडकीतून कापसाला आग लावली. चुदरी कुटुंब जवळच असलेल्या जुन्या घरात राहत असल्याने त्यांना रात्री या घटनेचा पत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी जेव्हा घराचा दरवाजा उघडला, तेव्हा समोर फक्त जळलेला कापूस व धूर होता. सुमारे १६ क्विंटल कापूस या आगीत जळून खाक झाला आहे.


घटनेची माहिती मिळताच बेंबाळ पोलीस आणि तलाठी कार्यालयाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या आगीमुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे उत्पन्न मातीमोल झाले असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबाळ पोलीस करत आहेत.