Chandrapur Murder News: चंद्रपूर हादरलं! फक्त 'कारल्याच्या भाजी'वरून पोटच्या मुलाने केली आईची हत्या

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या आईने जन्म दिला, वाढवलं, त्याच आईची एका नराधम मुलाने निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या कोणत्याही मोठ्या वादातून नाही, तर केवळ 'कारल्याची भाजी' का बनवली? या शुल्लक कारणावरून करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

हे क्रूर हत्याकांड चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडले आहे. ३५ वर्षीय आरोपी जगदीश दशरथ पेटकुले याला दारूचे भीषण व्यसन होते. याच व्यसनामुळे दोन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती, तेव्हापासून तो आपली ६५ वर्षीय आई सुमित्रा पेटकुले यांच्यासोबत राहत होता.
गुरुवारी रात्री जगदीश दारूच्या नशेत घरी आला. जेवताना ताटात कारल्याची भाजी पाहून त्याचा पारा चढला. "कारल्याची भाजी का केली?" असा जाब विचारत त्याने आईसोबत वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, नराधम जगदीशने आपल्या वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, सुमित्रा यांचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी जगदीशला ताब्यात घेतले आहे. एका माऊलीचा तिच्याच मुलाकडून असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.