चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीतील १०० मीटर धावण्याच्या चाचणीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला असून, प्रशासनाने उमेदवारांच्या बाजूने एक मोठा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ अंतर्गत, ११ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली होती. मात्र, १०० मीटर धावण्याच्या प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी तांत्रिक आक्षेप नोंदवले होते. या तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि भरती मंडळाने १०० मीटर चाचणी पुन्हा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोणाची चाचणी होणार? - ज्या उमेदवारांनी ११, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी चाचणी दिली होती, केवळ त्यांचीच १०० मीटरची फेरचाचणी होईल.
कधी होणार? - रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता.
कुठे होणार? - पोलीस मुख्यालय कवायत मैदान, तुकूम, चंद्रपूर.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर एखादा उमेदवार २२ फेब्रुवारीच्या फेरचाचणीला गैरहजर राहिला, तर त्याचे पूर्वीचेच गुण अंतिम मानले जातील. तसेच, ज्या उमेदवारांना त्याच दिवशी इतर परीक्षा किंवा वैद्यकीय कारण असेल, त्यांनी पुरावे सादर केल्यास त्यांना पुढील तारीख दिली जाऊ शकते.
पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या पारदर्शक निर्णयामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी पोलीस अधीक्षकांचे आभार मानले आहेत. मैदानी चाचणीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

