चंद्रपूर:- संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई येथे पार पडलेल्या 'फोर नेशन्स इंटरनॅशनल सेस्टोबॉल चॅम्पियनशिप २०२६' मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात ओमानचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
विशेष म्हणजे, या भारतीय संघात महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूरचे सुपुत्र मयूर बोनमपल्लीवार यांचा समावेश होता. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, श्रीलंका, युएई आणि ओमान या चार देशांच्या बलाढ्य संघांनी सहभाग नोंदवला होता. साखळी फेरीत उत्कृष्ट खेळ करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती.
अंतिम सामन्यात भारत आणि ओमान यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली, मात्र भारतीय खेळाडूंच्या अचूक नियोजनापुढे ओमानला नमते घ्यावे लागले.
चंद्रपूरसाठी अभिमानाचा क्षण:
मयूर बोनमपल्लीवार यांनी याआधीही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे, मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट सहभाग घेऊन सुवर्णपदक जिंकल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विजयामुळे सेस्टोबॉल या खेळाला भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात नवीन ओळख मिळाली आहे.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल आणि मयूर बोनमपल्लीवार यांच्या वैयक्तिक यशाबद्दल क्रीडा विश्वातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

