१९ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पोंभुर्णा:- एका छोट्याशा कारणावरून तरुण पिढी किती टोकाचं पाऊल उचलतेय, याचाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे समोर आला आहे. वडिलांनी यात्रेसाठी पैसे देण्यास उशीर केल्याच्या रागातून एका १९ वर्षीय युवकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोंभूर्णा येथील रामनगर परिसरातील रहिवासी भारत प्रमोद गुरनुले याने महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडा येथील जत्रेला जाण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. वडील म्हणाले, 'पैसे नंतर देतो'. मात्र, याच बोलण्याचा भारतला राग आला आणि तो रागाच्या भरात घराबाहेर पडला.
बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना लुंबिनी बुद्ध विहार परिसरातील एका विहिरीजवळ भारतच्या चपला आढळून आल्या. संशय बळावल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विहिरीत शोध घेतला असता, भारतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
भारतच्या या निर्णयामुळे गुरनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या १९ व्या वर्षी एका क्षणाच्या रागापायी भारतने स्वतःचे आयुष्य संपवले, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

