पोंभुर्णा:- पोंभूर्णा शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर येत आहे. पोंभूर्ण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एका २९ वर्षीय महिलेचा विजेचा तीव्र झटका लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घरासमोर भांडी घासत असताना हा काळाने झडप घातली.
पोंभूर्णा येथील रहिवासी सुफल सुनील वनकर या २९ वर्षीय महिला आज मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील लोखंडी शेडमध्ये नेहमीप्रमाणे भांडी घासत होत्या. मात्र, त्यांना कल्पनाही नव्हती की समोर मृत्यू उभा आहे. या शेडवरून जाणारी विद्युत पुरवठ्याची वायर कटलेली होती, ज्यामुळे संपूर्ण लोखंडी शेडमध्ये करंट उतरला होता.
भांडी घासताना सुफल यांचा स्पर्श अचानक त्या लोखंडी शेडला झाला आणि क्षणात त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. हा झटका इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी घरात कोणीही नसल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. काही वेळानंतर आरडीचे पैसे गोळा करणारा एजंट तिथे पोहोचला आणि हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर स्थानिक वार्डवासीयांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. सुफल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुफल यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

