चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या मैदानी चाचणीमधील '१०० मीटर धावणे' या प्रकाराची चाचणी आता पुन्हा घेतली जाणार आहे. भरती मंडळाने हा मोठा निर्णय घेतला.
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ अंतर्गत, गेल्या ११ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेनंतर काही उमेदवारांनी घेतलेले आक्षेप विचारात घेऊन भरती मंडळाने फेरचाचणीचा निर्णय घेतला आहे.
मुख्य मुद्दे लक्षात घ्या:
कोणाला संधी मिळणार? : ज्या उमेदवारांनी ११, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी मैदानी चाचणी दिली होती, केवळ अशाच पात्र उमेदवारांची १०० मीटर धावण्याची चाचणी पुन्हा घेतली जाईल.
तारीख आणि वेळ: ही चाचणी रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता पार पडेल.
ठिकाण: पोलीस मुख्यालय कवायत मैदान, तुकूम, चंद्रपूर.
महत्त्वाची अट:
जर कोणताही उमेदवार २२ फेब्रुवारीला या चाचणीसाठी गैरहजर राहिला, तर त्याचे पूर्वीचेच (म्हणजेच ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मिळालेले) गुण अंतिम मानले जातील. मात्र, ज्या उमेदवारांना त्याच दिवशी इतर ठिकाणी भरती, लेखी परीक्षा किंवा वैद्यकीय कारण असेल, त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास त्यांना पुढील तारीख दिली जाऊ शकते.
उमेदवारांना जर या निर्णयाबाबत काही तक्रार किंवा आक्षेप नोंदवायचा असेल, तर ते १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत लेखी स्वरूपात किंवा sp.chandrapur@mahapolice.gov.in या ईमेलवर तसेच ७८८७८९०१०० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

