Vijay Wadettiwar: "चंद्रपूर 'माफी' बातमी हा खोडसाळपणा", हितशत्रूंवर विजय वडेट्टीवारांचा आरोप

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महापालिका प्रकरणी मी माफी मागितल्याची बातमी ही पूर्णपणे खोडसाळपणाची असून, माझी काहीच चूक नसताना मी माफी का मागू?" असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. काही हितशत्रू जाणूनबुजून चुकीच्या बातम्या पेरत असून, ज्यांना स्वतःची नगरपरिषद जिंकता आली नाही तेच इतरांना प्रश्न विचारत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका व्यापार करार आणि त्याचे शेतकऱ्यांवरील परिणाम यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात ७ मार्च रोजी यवतमाळ येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेतून येणाऱ्या मालावर शून्य टक्के कर आकारला जाणार असून, भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर १० टक्के कर आकारला जाणार असल्याचा दावा करत त्यांनी हे धोरण असमान असल्याची टीका केली. या निर्णयाचा फटका राज्यातील कापूस, मका, तूरडाळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असून ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, असा इशारा त्यांनी दिला.

सध्या कापसाला सुमारे ४,५०० रुपये, तर मक्याला १,५०० रुपये दर मिळत असल्याचे सांगत त्यांनी सोयाबीनचे भावही कोसळल्याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार 'शक्तिपीठ' महामार्गासाठी जमिनी संपादन करण्यात अधिक रस दाखवत आहे, अशी टीका त्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करणारे हे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एक्सप्रेस वे बाबत मोठा निर्णय, मुंबई ते चंद्रपूर थेट एक्सप्रेस वेने जोडले जाणार

दिल्लीतील बैठक ही केवळ भारत-अमेरिका व्यापार करार आणि त्याविरोधातील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर प्रकरणात आपण कोणतीही चूक केलेली नसताना माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले