Chandrapur News: चंद्रपूरमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकाला अटक; घटनेने परिसरात खळबळ

Bhairav Diwase

चंद्रपूर:- समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला.

चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेत शुक्रवारी (दि.२० फेब्रुवारी) हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गोवर्धन गोंडाणे (५१) या नराधम शिक्षकाला पोक्सो अंतर्गत बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शाळेतील शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची कुणकुण शहर पोलिसांना लागली होती. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने शाहनिशा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी केली.

प्राथमिक तपासात तथ्य आढळताच महिला व बालविकास विभाग आणि चाइल्डलाइनच्या मदतीने विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी एकापाठोपाठ एक अशा सहा मुलींनी या नराधम शिक्षकाच्या कृत्यांचा पाढाच वाचला. त्यावरून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रमोद चौगुले, ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात पीएसआय पल्लवी काकडे, पीएसआय तृप्ती खंडाईत आदींनी केली.