एकाच रस्त्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असतानाच, शहरात आता विकासाच्या नावाखाली 'पायाभरणीचे राजकारण' चांगलेच तापले आहे. कारण काय? एकाच रस्त्याच्या दुहेरी भूमिपूजन समारंभाचा आरोप!
चंद्रपूरच्या रयतवारी कोळसा औद्योगिक वसाहतीतील एका महत्त्वाच्या रस्त्यावर सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई तीव्र झाली आहे.
रयतवारी कोळसा औद्योगिक वसाहतीतील विभाग क्रमांक ६ मध्ये हा तोच रस्ता आहे, जो रयतवारी कोळसा दवाखाना चौक ते बाबा साहेब आंबेडकर ग्रंथालयापर्यंत जातो. या रस्त्यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापले आहे.
भारतीय जनता पक्षाने या रस्त्याच्या भूमिपूजनाचा भव्य समारंभ आयोजित केला, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हे 'दुसरे' भूमिपूजन होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अड्डुर यांनी.
अड्डुर यांचा थेट दावा आहे की, ज्या रस्त्याचे श्रेय भाजप आता घेण्याचा प्रयत्न करत आहे, तो रस्ता महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाला होता आणि त्याचे भूमिपूजन यापूर्वीच झाले आहे.
हा रस्ता माझ्या कार्यकाळात, माझ्या प्रयत्नांमुळे मंजूर झाला. रस्त्याचे जवळपास ७०% काम पूर्ण झाले आहे. भाजप आता उरलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी, निवडणुकीपूर्वी जनतेची दिशाभूल करत आहे आणि मागील कामाचे श्रेय चोरत आहे. हे दुहेरी भूमिपूजन म्हणजे निव्वळ राजकारण आहे." असे माजी नगरसेवक राजेश अड्डुर यांनी म्हटले आहे.
या आरोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अड्डुर यांनी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांना आव्हान देत, प्रथम बीएमटी चौकातील बायपास रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे आणि त्यानंतरच नवीन विकासकामांचे भूमिपूजन करावे, असे म्हटले आहे.
म्हणजेच, निवडणुकीपूर्वी चंद्रपूरमध्ये विकास कामांचे श्रेय घेण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की, एकाच कामासाठी दोनदा भूमिपूजन करण्याची वेळ आली आहे. आता या वादग्रस्त रस्त्याचे श्रेय कोणत्या पक्षाला मिळते आणि या दुहेरी भूमिपूजनाचे वास्तव चंद्रपूरच्या जनतेला कधी समजते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यामुळे चंद्रपूरमध्ये केवळ विकासावर नाही, तर विकासकामांच्या श्रेयवादावर सुद्धा राजकारण तापल्याचे चित्र आहे.


