राज्य अंधारात जाणार? महानिर्मितीकडे केवळ दिड दिवसाचा कोळसा शिल्लक. #Coal #balance

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महानिर्मिती गेल्या दोन महिन्यांपासून कोळसाटंचाईचा सामना करत असून हे संकट आणखी गडद झाले आहे. महानिर्मितीच्या सर्व सात औष्णिक वीज केंद्रांमध्ये केवळ दीड दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे.
या सुपर क्रिटीकल परिस्थितीत सध्या होत असलेल्या दैनंदिन कोळशाच्या पुरवठय़ात नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणामुळे खंड पडल्यास येथील संपूर्ण वीजनिर्मिती बंद पडून राज्य अंधारात जाण्याची भीती आहे.
औष्णिक वीज केंद्रातून अखंडित वीजनिर्मिती करण्यासाठी किमान पंधरा दिवसांच्या कोळशाचा साठा असणे आवश्यक आहे. महानिर्मितीच्या नाशिक, परळी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, पारस आणि कोराडी या सात वीज प्रकल्पांची एकूण वीजनिर्मिती क्षमता 7 हजार 700 मेगावॅट आहे. येथून एकूण क्षमतेच्या जवळपास 75 ते 80 टक्के एवढी वीजनिर्मिती केली जात असून त्यासाठी दररोज जवळपास 80 हजार मेट्रिक टन कोळसा लागतो.
सध्या महानिर्मितीकडे केवळ एक-दीड दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे. तर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, एसईसीएल आणि एमसीएलकडून 70-80 हजार मेट्रिक टन कोळसा पुरवला जात आहे. त्यामुळे 'हॅण्ड टू माऊथ' प्रमाणे महानिर्मिती दररोज येईल त्या कोळशावर पाच हजार मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करत आहे. मात्र या सुपर क्रिटीकल परिस्थितीमध्ये अतिवृष्टी, रेल्वच्या तांत्रिक कारणामुळे कोळसा कंपन्यांकडून कोळसा उपलब्ध न झाल्यास वीजनिर्मिती बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
सुपर क्रिटीकलपेक्षाही वाईट परिस्थिती.....

सर्वसामान्यपणे औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासाठी पंधरा दिवसांचा कोळसा उपलब्ध असणे आवश्यक असते. कोळशाचा साठा दहा दिवसांपेक्षा कमी झाल्यास क्रिटीकल परिस्थिती समजली जाते. तर कोळशाचा साठा पाच दिवसांपेक्षा कमी झाल्यास सुपर क्रिटीकल परिस्थिती समजली जाते. मात्र सध्या यापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
वीज केंद्र शिल्लक कोळसा....

नाशिक एक दिवसाचा
खापरखेडा दीड दिवसाचा
परळी दीड दिवसाचा
चंद्रपूर दीड दिवसाचा
भुसावळ अर्ध्या दिवसाचा
पारस सव्वा दिवसाचा
कोराडी दीड दिवसाचा
महानिर्मितीसमोर सध्या कोळशाचे संकट उभे असून केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे दररोज जेवढय़ा कोळशाचा पुरवठा होत आहे त्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामध्ये खंड पडल्यास वीजनिर्मिती ठप्प होऊ शकते.
पुरुषोत्तम जाधव, संचालक (कोळसा)