Sunday Market: २३ नोव्हेंबरला संडे मार्केट भरणार नाही; मनपा प्रशासनाचा मोठा निर्णय.

Bhairav Diwase

चंद्रपूर:- MAHATET 2025 (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा) च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या परीक्षेच्या दिवशी, म्हणजेच दिनांक २३ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी, शहरातील दर आठवड्याला भरणारे संडे मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मनपा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी शहरातील विविध शाळांमध्ये MAHATET 2025 परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
परीक्षा केंद्रांजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षा, परीक्षा केंद्राची शिस्त आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. दर रविवारी संडे मार्केटमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मनपा प्रशासनाने सर्व संडे मार्केटमधील व्यावसायिक तसेच नागरिकांना या महत्त्वाच्या सूचनेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. २३ नोव्हेंबर रोजी संडे मार्केट भरणार नाही, याची नोंद घेऊन सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.