चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. २५ फेब्रुवारी रोजी घडलेल्या भीषण रासायनिक अपघातात दोन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी आज पत्रपरिषद घेऊन कंपनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत सल्फ्युरिक अॅसिड अनलोडिंग करताना भीषण अपघात झाला. यामध्ये स्वाती उईके आणि अक्षय कन्नाके हे दोन तरुण कामगार गंभीररीत्या भाजले गेले आहेत. स्वातीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या आयुष्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, कंपनी प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लपवून कामगार किरकोळ जखमी असल्याचे भासवल्याचा खळबळजनक आरोप बंडू हजारे यांनी केला आहे.
जखमींच्या कुटुंबाला तातडीने ५० लाख रुपयांची मदत द्यावी. जिल्हास्तरीय उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी. SOP, सेफ्टी ऑडिट रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज तत्काळ जप्त करावे. दोषींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. जखमीच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
बंडू हजारे यांनी स्पष्ट केले की, ७ दिवसांच्या आत प्रशासनाने आणि कंपनीने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या पत्रपरिषदेला युवराज धानोरकर आणि राजेश राठोड यांचीही उपस्थिती होती. आता या प्रकरणावर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

