वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू
चिमूर:- चिमूर तालुक्यातील गदगाव येथे गुरुवारी दि. ३० जुलैला दुपारी पावसासह सुरू असलेल्या मेघगर्जनेदरम्यान शेतातील गोट्यातून गाय आणण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुहास जयेंद्र काळे (वय २१, रा. गदगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सुहास शेतातील गोट्यातून गाय आणण्यासाठी गेला होता. त्याचवेळी परिसरात अचानक मुसळधार पाऊस व जोरदार मेघगर्जना सुरू झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी त्याने एका झाडाचा आसरा घेतला. मात्र काही क्षणांतच झाडाजवळ वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत सुहास गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठविण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गदगाव गावावर शोककळा पसरली असून, एका होतकरू विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने काळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

