वर्धा नदीला पूर, भोयेगाव-चंद्रपूर मार्ग बंद
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून वर्धा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने वर्धा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. याचा थेट फटका वाहतुकीला बसला असून भोयेगाव येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे भोयेगाव-चंद्रपूर मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केली आहे. नदीकाठच्या गावांना आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

