चंद्रपूर:- आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या ४७८ रिक्त जागांसाठीची भरती परीक्षा आता सुधारित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. उमेदवारांच्या मागण्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने परीक्षा केंद्र व वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले आहेत.
चंद्रपूर प्रकल्पासाठी नवीन वेळ आणि तारीख:
चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा पूर्वी २८ जुलै २०२६ रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये नियोजित होती. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून ही परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर प्रकल्पातील सर्व उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन आपले सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) तत्काळ डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रांमधील बदल:
राज्यभरातील इतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना पसंतीक्रमापेक्षा लांबचे परीक्षा केंद्र मिळाले होते. उमेदवारांच्या या हरकती व विनंत्यांची दखल घेत प्रशासनाने त्यांच्या परीक्षा केंद्रांमध्ये सुधारणा केली आहे. मात्र, इतर प्रकल्पांतील उमेदवारांच्या परीक्षेच्या दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महत्त्वाची सूचना: आदिवासी विकास विभागाने सर्व उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून आपले सुधारित प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करून त्यावरील नवीन परीक्षा केंद्र, तारीख, शिफ्ट आणि वेळेची खात्री करून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

