Chandrapur News: १४ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून घरात डांबले!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शाळेत गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला घरात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे या चिमुकलीची सुटका करण्यात यश आले आहे.


२४ जुलै रोजी नववीत शिकणारी ही मुलगी नेहमीप्रमाणे सायकलने शाळेत गेली होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. तिच्या वर्गमैत्रिणीकडून माहिती मिळाली की, ती तिचा मित्र लोकेश चव्हाण (रा. राजीवनगर) याच्यासोबत गेली होती.


माहिती मिळताच कुटुंबीयांनी थेट आरोपी लोकेशचे घर गाठले. तेथे मुख्य दरवाजाला कुलूप होते, मात्र आतून मुलीचा आवाज येत होता. आरोपी लोकेशने तेथे पोहोचून हुज्जत घातली, परंतु दबावानंतर दरवाजा उघडला असता मुलगी आत डांबून ठेवलेली आढळली.


या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या पीडितेच्या मोठ्या बहिणीला आरोपीने जबर मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तो घटनास्थळावरून फरार झाला.


चंद्रपूर शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी लोकेश चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृणाल रामटेके या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.