भद्रावतीत लाचखोर वन कर्मचाऱ्यांना दणका
चंद्रपूर:- जिल्ह्यातील वनविभागात लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या जाळ्यात तीन जण अडकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती तालुक्यामध्ये ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक करणाऱ्या एका तक्रारदाराकडून ही लाच मागण्यात आली होती. रेती वाहतुकीवर जप्ती किंवा कोणतीही दंडात्मक कारवाईची कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत न पाठवण्याच्या मोबदल्यात, २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ACB च्या पथकाने भद्रावती परिसरात अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला. या सापळ्यात लाचेची रक्कम स्वीकारताना वनक्षेत्र सहाय्यक कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि ललित नागपुरे नावाचा एक खासगी इसम या तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले.
या धडक कारवाईमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात वनविभागातील आणखी काही अधिकाऱ्यांचे हात गुंतले आहेत का? याचा पुढील सखोल तपास ACB ची टीम करत आहे.

