चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा रंगली असली, तरी पोलिसांनी याबाबत महत्त्वाची आणि वेगळी माहिती समोर आणली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा कोणताही प्राणघातक हल्ला नसून फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील अंतर्गत वादातून झालेली शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेली धक्काबुक्की होती. या घटनेत कोणत्याही प्रकारच्या धारदार शस्त्राचा वापर झालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी केली. या फुटेजमध्ये दोन्ही गटांत प्रथम शाब्दिक वाद आणि त्यानंतर धक्काबुक्की झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या 'तिरंगा रॅली'दरम्यान फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्याच जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत तिघांविरुद्ध यात फिरोज गुलझार खान, फरहान फिरोज खान, फैजान फिरोज खान यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

